औरंगाबाद: औरंगाबाद, जालना लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता काही तास उरले आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देत आहेत. पदयात्रा, कॉर्नर बैठकांसह जाहीर सभा घेण्याचा धडाका सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची लगीनघाई सुरू झाल्याचे दिसत आहे. दोन दिवसांत जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्याला मतदान करावे यासाठी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम, शिवस्वराज्य बहुजन पक्षासह अन्य उमेदवार भर देताना दिसत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत असल्याने मतदार नेमका कोणाला कौल देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.लोकसभेची निवडणूक 23 एप्रिल (मंगळवार) रोजी होणार आहे. निवडणूक रिंगणात प्रमुख राजकीय पक्षातर्फे विद्यमान खासदार आणि तीन आमदारांसह 23 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारवेळेस चंद्रकांत खैरे यांची काँग्रेस उमेदवारांसोबत सरळ सरळ लढत झाली होती, तर काही वेळा तिरंगी लढत झाली. यावेळी मात्र निवडणुकीचे चित्रच बदलले आहे.
यंदा निवडणूक रिंगणात विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील तीन आमदार लढत देत आहेत. तीनही आमदार प्रबळ आहेत. यामुळे यावेळी सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रत्येक वेळेस जाती-धर्माच्या तसेच भावनिक प्रश्नांना समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून निवडणुका लढल्या गेल्या. पण या वेळेस शिवसेना-भाजप युतीकडून खा. चंद्रकांत खैरे काँग्रेस महाआघाडीतर्फे आ. सुभाष झांबड, वंचित आघाडीकडून एमआयएमचे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार इम्तियाज जलील तर शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या वतीने कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव तर नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षातर्फे सुभाष पाटील या प्रमुख उमेदवारांसह 23 जण रिंगणात आहेत. काही अपक्ष उमेदवारांनी ही आपआपल्या विभागात प्रचाराचा जोर धरला आहे. अपक्ष मंडळीही चार आकडी मते घेतात हे यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. अपक्षांना मिळणार्या मतामुळे ही विजयी उमेदवाराच्या वाटेत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व उमेदवारांनी ग्रामीण भागात व शहरी भागात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. जसजसा प्रचार संपण्याची वेळ जवळ येत आहेत. तसतसे प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना भेटण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.